Zee Talkies Light Houseमहाराष्ट्राची नस अचूक ओळखणाऱ्या 'झी टॉकीज'ने कलात्मकता आणि व्यावसायिकतेची  योग्य सांगड घालत आजवर अनेक उपक्रमांनी रसिकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. ‘लाईट हाऊस’ हा असाच एक आगळा वेगळा उपक्रम घेऊन 'झी टॉकीज' आता लघुपटांसाठी एक नव दालन खुलं करणार आहे. जगभरात तयार  होणाऱ्या उत्तम लघुपटांना योग्य व्यासपीठ मिळावे यासाठी एखाद्या वाहिनीने पुढाकार घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. ‘लाईट हाऊस’ या नावाची सुद्धा एक खासियत आहे. टॅलेंट असूनही प्रकाशात नसलेल्या कलाकर्मींना प्रकाशात आणणार व्यासपीठ म्हणून या उपक्रमाचं नाव ‘लाईट हाऊस’ असं ठेवण्यात आलं आहे. १० जानेवारीपासून  झी टॉकीजवर सुरु होणार आहे प्रवास गोष्टींचा, 'लाईट हाऊस’ दर शनिवारी रात्री ९ वाजता आणि पुनःप्रक्षेपण रविवारी सकाळी १० वाजता! 

जगभरातील वेगवेगळ्या भाषेतील निवडक लघुपट कलाकृती 'झी टॉकीज'वर प्रेक्षकांना पहाता येतील. सुरुवातीच्या भागांमध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांपासून ते ख्यातनाम दिग्दर्शकांच्या लघुपटांचा यात समावेश असेल. दाखवण्यात येणाऱ्या लघुपटाच्या वेळी दिग्दर्शकाचा लघुपट बनवण्यामागचा विचार तसेच दिग्दर्शकाला लघुपट करताना व तो प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यात आलेल्या अडचणीसुद्धा जाणून घ्यायला मिळणार आहे. लघुपटांच्या स्क्रीनिंगसोबतच लघुपट मार्गदर्शनाची कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे. लघुपटांसाठी प्रवेशिका मागवत इच्छुक नव्या दिग्दर्शकांना लघुपट तयार करण्याची संधी दिली जाणार आहे. यानंतरच्या भागात लघुपट महोत्सव आयोजित केला जाणार असून शॉर्ट फिल्म् विजेत्याची घोषणा या महोत्सवाच्या वेळी करण्यात येणार आहे.  या महोत्सवाच्या वेळी नामवंत दिग्दर्शकांचे अनुभवांचे बोल उपस्थित सर्वांनाच जाणून घ्यायला मिळतील. झी टॉकीज वर  ‘लाईट हाऊस’ डे  असा एक दिवस साजरा केला जाणार आहे. या नव्या अंदाजातल्या ‘लाईट हाऊस’ डे मध्ये स्पर्धेतल्या निवडक लघुपटांसोबत विजेता लघुपट दाखवण्यात येईल.